शिक्रापूर सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

शेतकऱ्याचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून अडवला 

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून जेसीबीच्या सहाय्याने खोदून अडवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिक्रापूर सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब आण्णासाहेब मांढरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नितीन खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी दिलीप खेडकर यांची शेती विकत घेतलेली असून सदर शेतीला चासकमान कालव्याचा जुना रस्ता आहे. सदर रस्ता यापूर्वी दत्तात्रय मांढरे यांनी अडविला असल्याने नितीन खेडकर यांनी शिरुर तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार तहसीलदार यांनी सदर रस्ता खुला करण्याच्या आदेश मंडलाधिकारी यांना दिलेले असताना त्यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या बंदोबस्तात सदर रस्ता खुला करण्यात आला.

मात्र त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा दत्तात्रय मांढरे यांनी सदर रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून पुन्हा अडवला. त्यामुळे खेडकर यांनी पुन्हा तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तहसीलदार यांनी सदर रस्त्याचा पंचनामा करण्याचे आदेश मंडलाधिकारी यांना दिले. त्यानुसार मंडलाधिकारी यांनी रस्त्याचा पंचनामा करत तहसीलदार यांना सादर केला.

नुकतेच नितीन ज्ञानेश्वर खेडकर (वय ३८) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब अण्णासाहेब मांढरे दोघे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बापू हडागळे हे करत आहे.