मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती कार्यक्रमांच्या अधिकृत सूचीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून २२ जुलै या त्यांच्या जयंतीचा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये नव्याने समावेश करणे आवश्यक आहे.
यासाठी आवश्यक सुधारित परिपत्रक तातडीने जारी करून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांना त्याबाबत सूचना देण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती भुजबळ आणि मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.