मुंबई :राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त १८ ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या निबंध व काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेला राज्यभरातील शाहूप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
निबंध स्पर्धेत पत्रकार राजन पारकर (मुंबई) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर काव्य स्पर्धेत अमित माने (कल्याण) यांना प्रथम क्रमांक आणि अमरसिंह जगदाळे (कोल्हापूर) यांना द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
विजेत्यांना प्रमाणपत्र तसेच राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. समाजात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा प्रचार-प्रसार आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
राजर्षी शाहू सलोखा मंच आणि राजर्षी शाहू स्तंभ स्मृती समिती, मुंबई यांच्या वतीने वर्षभर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस असून, शासनाच्या सहकार्याने आयआयटीच्या विद्यार्थ्यांपासून महापालिका शाळांपर्यंत निबंध स्पर्धा पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव ६ मे २०२७ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १३ वी गल्ली, खेतवाडी, गिरगाव (मुंबई) येथील शाहू महाराजांच्या स्मृतीस्तंभ परिसरात करण्यात येणार आहे. याच ठिकाणी पूर्वी शाहू महाराजांचा राजवाडा होता आणि त्यांचे निधनही येथेच झाले होते. सध्या राजवाडा अस्तित्वात नसला तरी मुंबईत राजर्षी शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी शाहूप्रेमींची मागणी असून त्यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती समितीच्या समन्वयक प्रज्ञा जाधव यांनी दिली.