दापचरीत 1,395 एकरांवर उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार; महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला मिळणार नवी झेप

महाराष्ट्र

वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र; 10 हजारांहून अधिक रोजगार, शेतमाल निर्यातीला मोठी चालना

मुंबई: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ विकसित होणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेशी जोडणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत रावल म्हणाले की, फ्रान्समधील रुंगीस मार्केट, नेदरलँड्समधील रॉयल फ्लोरा हॉलंड आणि रॉटरडॅम परिसरातील आधुनिक कृषी लॉजिस्टिक व्यवस्थेच्या धर्तीवर हा बाजार विकसित केला जाणार आहे. राज्यात आंतरराष्ट्रीय बाजार, राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अशी त्रिस्तरीय विपणन व्यवस्था उभारण्याचाही शासनाचा मानस आहे.

या प्रकल्पात घाऊक व्यापार, आयात-निर्यात सुविधा, शीतसाखळी, ग्रेडिंग-पॅकेजिंग, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, गुणवत्ता परीक्षण केंद्र, कंटेनर टर्मिनल, रेल्वे सायडिंग, ई-लिलाव आणि निर्यात सुलभता केंद्र अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र सध्या देशाच्या कृषी निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, दापचरी प्रकल्पामुळे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मसाले आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे काढणीनंतर होणारे नुकसान आणि वाहतूक खर्च 15 ते 20 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा असून, 10 हजारांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. वाढवण बंदर, जेएनपीए, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसारख्या पायाभूत सुविधांशी जोडणीमुळे महाराष्ट्राची कृषी निर्यात अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत