दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

महाराष्ट्र

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांनी दूध खरेदी करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, स्किम मिल्क पावडर, विविध रसायने, साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कृत्रिम गायीचे दूध सुमारे १५ रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधासारखे कृत्रिम दूध सुमारे ३० रुपये प्रति लिटर खर्चात तयार होऊ शकते.

घरच्या घरी प्राथमिक चाचण्या

पाण्याची भेसळ: काचेवर दुधाचा थेंब टाका. शुद्ध दूध हळूहळू वाहून पांढरी रेघ सोडते, तर पाणी मिसळलेले दूध पटकन वाहते.

स्टार्च: थंड दुधात २-३ थेंब आयोडीन टाकल्यावर निळसर रंग आल्यास स्टार्च असण्याची शक्यता.

डिटर्जंट: दूध बाटलीत घेऊन हलवल्यावर जास्त आणि दीर्घकाळ टिकणारा फेस दिसल्यास डिटर्जंटची शक्यता.

सिंथेटिक दूध: उकळताना विचित्र वास येणे किंवा हातात चोळल्यावर साबणासारखा गुळगुळीतपणा जाणवल्यास सावध राहावे.

दूध खरेदी करताना काय तपासाल?

Ingredients (घटक)

Fat (%)

SNF (%)

Packaging Date

Best Before

Expiry Date

ग्राहकांसाठी सूचना

विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच दूध खरेदी करा. पॅकेजवरील माहिती काळजीपूर्वक वाचा. संशयास्पद दूध आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करा. स्वस्त दराच्या मोहाला बळी न पडता प्रमाणित आणि सुरक्षित दूधच वापरा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत