नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार

शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये सुरू केलेल्या विशेष चोरीविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती आणि नागरिकांच्या सतर्क सहकार्यामुळे सलग सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आठवडे बाजारातील वाढत्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल, दागिने व रोकड चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तैनात करण्यात आली होती. बाजार परिसरात नियमित गस्त घालण्यासह संशयास्पद हालचाली दिसताच त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत होते.

या मोहिमेत शिक्रापूर आठवडे बाजारात सारिका राजू जाधव व साक्षी मेघराज पवार (रा. मांतरवाडी, हडपसर) यांना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर कोरेगाव भीमा बाजारात नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद (रा. शिरूर) यांनाही अटक करण्यात आली.

दरम्यान, आज पुन्हा कोरेगाव भीमा आठवडे बाजारात गस्तीदरम्यान मालन सहदेव पवार, रेखा गणेश दगडे आणि सायली कार्तिक दगडे (सर्व रा. वाघोली, ता. हवेली) या तिघींना चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण कारवाईत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल शिक्रापूर पोलीस ठाण्यात विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे (रा. कोरेगाव भीमा), तसेच सिकंदर शेख, रियाज शेख (रा. शिक्रापूर) आणि इतर नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे तसेच श्रावण गुपचे, सुरेंद्र सरोदे आणि अजिंक्य कुदळे उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, “पोलीस आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. भविष्यातही नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे.”

शिक्रापूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे आठवडे बाजारातील चोरट्यांमध्ये धाक निर्माण झाला असून व्यापारी आणि नागरिकांकून या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत