तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह जिहाद’ होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या भूमिकेवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या भूमिकेला विरोध करत सर्वसमावेशकतेची भूमिका मांडली. “आपला उत्सव सर्वांना सामावून घेतो. एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात गैर काय आहे?” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
अमृता फडणवीस यांच्या या भूमिकेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. “मी अमृता फडणवीस वहिनीसोबत आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे,” असे राऊत म्हणाले.
यावेळी राऊत यांनी अमृता फडणवीस यांना त्यांच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या भाजपमधील नेत्यांचे ‘काऊन्सिलिंग’ करण्याचा सल्लाही दिला. “तुम्ही फडणवीसांच्या लाडक्या बोगस हिंदुत्ववाद्यांचे काऊन्सिलिंग करा,” अशी टीका त्यांनी केली.
“जे यजमान आहेत, देवेंद्र फडणवीस, त्यांच्या मंत्रिमंडळात जे टोळभैरव आहेत, नवहिंदुत्ववादी आहेत, त्यांना सांगायला हवं की हा महाराष्ट्र आणि हा देश बनवण्यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे फार मोठे योगदान आहे,” असेही संजय राऊत यांनी म्हटले.
नवरात्री उत्सवाला अद्याप जवळपास महिनाभराचा अवकाश असला, तरी गरबा-दांडियाच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता आहे.