लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन होताच स्थानिक मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ तसेच ‘लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाचा विजय असो’ अशा घोषणांनी हिथ्रो विमानतळ परिसर दणाणून गेला.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची दखल घेत त्यांना लंडनमध्ये होणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने शिंदे यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र मंडळाच्या वतीने त्यांना ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात येत असल्याचे निमंत्रकांकडून सांगण्यात आले आहे.
या सन्मानासाठी शिंदे यांच्या कार्यकाळातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या तीन प्रमुख योजनांची विशेष दखल घेण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे, नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, या योजनांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला आहे.
दरम्यान, लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिंदे आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे जगभरातील मराठी बांधवांसह शिवसैनिकांचे लक्ष लागले असून, हा सन्मान महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.