शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. कालव्याच्या सुरुवातीच्या म्हणजेच ‘हेड’कडील भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असतानाही प्रशासनाने शेवटच्या टोकाकडून म्हणजेच ‘टेल’कडून अस्तरीकरणाचे काम सुरू केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार (दि २७) सकाळी सुमारे अकरा वाजता सुरु असलेले काम बंद पाडले.
आंबळे शेतकरी प्रमोद बेंद्रे यांच्या घरासमोर मशिनरीच्या साहाय्याने कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरु होते. याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी एकत्र आले. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मशिनरी थांबवली. गळती ज्या ठिकाणी सर्वाधिक आहे, त्या भागाकडे दुर्लक्ष करुन अन्यत्र अस्तरीकरण करणे म्हणजे सरकारी निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
यावेळी शेतकरी कृती समितीचे सदस्य, तात्यासाहेब सोनवणे, दादासाहेब बेंद्रे, आशितोष बेंद्रे, सागर खंडागळे, विशाल झेंडे, गणेश बेंद्रे, पंचायत समिती सदस्य दीपक कोकडे, श्रीराम शेलार, अशोक कोळपे, मयूर बेंद्रे, सचिन बेंद्रे, अक्षय नरवडे, निलेश बेंद्रे यांच्यासह महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
चासकमान डाव्या कालव्याच्या ‘हेड’कडील भागातून लाखो लिटर पाणी गळतीमुळे वाया जाते. परिणामी कालव्याच्या पुढील भागातील शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही. गळतीचे मूळ ठिकाण दुरुस्त करण्याऐवजी ‘टेल-टू-हेड’ पद्धतीने काम सुरू ठेवण्यामागे नेमका कोणता तांत्रिक आधार आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. “गळती हेडला आणि अस्तरीकरण टेलला, हा कोणता न्याय…?” असा संतप्त प्रश्नही शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कालव्याच्या हेडकडील गळती थांबविल्याशिवाय पुढील भागात अस्तरीकरण करुन अपेक्षित फायदा होणार नाही. पाणी सुरुवातीलाच जमिनीत मुरत असेल, तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे पोहोचणार, हा साधा प्रश्न जलसंपदा विभागाला का समजत नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, चासकमान धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असतानाही डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पावसाने काही दिवस ओढ दिल्यास खरीप पिके धोक्यात येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची तातडीची गरज आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही ते शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचत नसेल, तर जलसंपदा विभागाचे नियोजन नेमके कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनाने अस्तरीकरणाचा संपुर्ण आराखडा शेतकऱ्यांसमोर जाहीर करावा, हेडकडील मुख्य गळतीची ठिकाणे प्रथम दुरुस्त करावीत आणि डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.