शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात

आरोग्य मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटल मध्ये प्रगत अत्याधुनिक उपचार तसेच डॉक्टरांनी घेतलेले अथक परिश्रम यामुळे असाध्य आजारावर रुग्णाला योग्य उपचार देत तब्बल १९ दिवस व्हेंटिलेटर वर ठेवूनही रुग्णाला बरे करण्याची किमया डॉक्टरांनी साधली आहे. याबाबत शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पीटलचे डॉ अखिलेश राजुरकर यांनी शिरुर येथे पत्रकार परीषदेमध्ये हि माहिती दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमा टोपोनो (वय २३) रा. सध्या आमदाबाद फाटा, मुळ रा. कोलकाता) या रुग्णाला गंभीर अवस्थेत (दि १४) जानेवारी रोजी श्री गणेशा हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी हॉस्पिटल मध्ये दाखल करत असताना रुग्णाला हातपाय हलवता येत नव्हते. त्याचे शरीर ताठरलेले अवस्थेत आणि कमरेखाली प्रचंड वेदना व तोंड उघडत नव्हते.

तसेच त्याला बोलताही येत नव्हते आणि श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. अशी अनेक गंभीर लक्षणे असताना रुग्णाला दवाखान्यात दाखल केले होते. या आजाराचे डॉक्टरांना नेमके निदान करणे आवश्यक होते. यावेळी सर्व आवश्यक तपासण्या केल्या असता रुग्णास धनुर्वात (tetanus) मधील दुर्धर आजाराचे निदान झाले. धनुर्वात हा आजार अतिशय दुर्मिळ असा असुन भारतात मागील वर्षी ५८ रुग्णांची नोंद आढळून आली आहे. तर सन २०१९ मध्ये जगभरात ७३ हजार रुग्ण सापडले असून त्यांपैकी ४८ हजार रुग्ण दगावल्याची नोंद आहे. लहान मुले ते धनुर्वात लस न घेतलेले रुग्ण याची शिकार होत आहेत.

 

श्री गणेशा हॉस्पिटल येथे रुग्ण दाखल केल्यानंतर स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले. रुग्णाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून या वॉर्ड मध्ये प्रकाश विरहित व आवाज येणार नाही.याची विशेष काळजी घेण्यात आली. टिटॅनस इम्युनोग्लोब्युलिन हे इंजेक्शन भारतात कमी प्रमाणात उपलब्ध असताना त्यास मागवून घेऊन त्या इंजेक्शन मधील औषधाचा काही भाग मनक्यात व मांसपेशीत देण्यात आला. तसेच सातत्याने रुग्णावर लक्ष ठेवण्यात आले.

 

ज्या ठिकाणी जखम आहे त्याची विशेष काळजी घेण्यात आली. सुमारे १९ दिवस रुग्णाला कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले. सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. तसेच कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) बंद करण्यात आले असून रुग्ण स्वतः श्वास घेत आहे. प्रगत अत्याधुनिक उपचार पद्धती व श्री गणेशा हॉस्पिटल चे डॉक्टर व स्टाफ ने घेतलेल्या मेहनतीमुळे दुर्धर आजारावर मात करत या रुग्णास वाचविण्यात यश आले आहे.

 

याविषयी माहिती देताना हॉस्पिटलचे संचालक डॉ अखिलेश राजुरकर तसेच संचालक डॉ विशाल महाजन यांनी सांगितले की, वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित होत असताना संपुर्ण करिअर मध्ये अशा प्रकारचा रुग्ण प्रथम पहावयास मिळाला असून त्यावर अचून निदान व योग्य उपचार दिल्याने दुर्मिळ आजारावर इलाज करता आला आहे. यासाठी हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे तज्ञ डॉ सारंग पाठक, डॉ सौरभ पाठक, डॉ अक्षय काळे, डॉ अभय घोडेकर, डॉ सुमित रोकडे, डॉ शुभम घोडे, फिजिओथेरपिस्ट डॉ पुनम केंदळे, डॉ सागर केदारे, सुरज खरात, शिल्पा झंजाड, शुभांगी गावडे, मोनिका गायकवाड, प्रेतीना मोची, आशिकेश शेळके, शीतल पोकळे, वैशाली पडवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

या विषयी अधिक माहिती देताना आमदाबाद येथील मंगेश थोरात व राहुल थोरात यांनी सांगितले की, श्री गणेशा हॉस्पीटलने सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण दाखल केल्यानंतर उपचार केलेच परंतु महागडी औषधे देखील बाहेरुन मागविली. रक्ताचे नाते नसतानाही आमदाबाद ग्रामस्थ व श्री गणेशा हॉस्पीटलने दाखविलेल्या तत्परतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त