बीड : उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात विकासकामांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यांच्या या कार्यशैलीमुळे “बीडच्या विकासाचा वेग कायम राहणार” असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
गुरुवारी सलग बैठका घेऊन विकासकामांचा आढावा, नागरिकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. आरोग्य सुविधांची माहिती घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या स्पष्ट सूचना देत कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा संदेश दिला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासासाठी सुरू केलेल्या कामांना गती दिल्यानंतर त्यांच्या निधनामुळे विकासाचा वेग मंदावेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारत विकासाचा धागा तुटू देणार नाही, हे आपल्या कामातून दाखवून दिल्याची भावना बीडकर व्यक्त करत आहेत.
दोन दिवसांच्या दौऱ्यातील त्यांच्या झपाट्याने सुरू असलेल्या कामकाजामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.