करडे येथील एस टी बस स्थानक कॅन्टीनच्या बाजूला अतिक्रमण

इतर शिरूर तालुका

आगार व्यवस्थापकांची तहसीलदार आणि पोलिसांकडे लेखी तक्रार

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकामधील कॅन्टीनच्या बाजूने स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण केल्याबाबत शिरुर आगार व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन शिरुर आगाराचे व्यवस्थापक यांनी पर्यवेक्षकांना प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पर्यवेक्षकांनी बस स्थानकाची पाहणी करत राज्य परिवहन मंडळाच्या स्थानकामध्ये असलेल्या बस कॅन्टीनच्या पूर्वेला झालेल्या बांधकामाची गॅलरी ही कॅन्टीनच्या वर आली असल्याचा अहवाल आगार व्यवस्थापक यांना सादर केला होता. अहवालाच्या अनुषंगाने आगार व्यवस्थापक यांनी तक्रारीत तथ्य असल्याने राज्य परिवहन मंडळाचे शिरूर आगार व्यवस्थापक यांनी करडे बस स्थानकात झालेल्या अतिक्रमणाची दखल घेण्यात यावी अशी लेखी तक्रार शिरुर तहसिलदार तसेच शिरुर पोलीस स्टेशनला दिली आहे.

unique international school
unique international school

शिरुर-चौफुला हा रस्ता सोलापूर महामार्गाला जोडणारा रस्ता असून या रस्त्यावर करडे हे गाव आहे. हे गाव या रस्त्यावरील दळणवळणाचे महत्वाचे केंद्रबिंदू असून या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानक आहे. जवळच तालुक्याचे ठिकाण असल्याने करडे परिसरातील गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सुरक्षित असल्याने नागरिक व विद्यार्थी एसटीने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. मात्र गावातील एस टी चे बस स्थानक हळूहळू स्थानिक रहिवाशांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. करडे येथील हे महत्वाचे राज्य परिवहन मंडळाचे बस स्थानक असून परिवहन विभागाने अतिक्रमण हटवून बस स्थानक हायटेक केल्यास प्रवाशीवर्ग वाढेल तसेच राज्य परिवहन मंडळाच्या महसूलमध्ये देखील भर पडणार आहे.

करडे येथे शिरुर-चौफुला रस्त्यालगत अतिक्रण करणाऱ्यांवर सुद्धा संबधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासकीय जागेत दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढ होत असुन ही बाब अतिशय गंभीर आहे. संबधित विभागाने याकडे दुर्लक्ष न अतिक्रमण करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे गरजचे आहे. अन्यथा भविष्यात हे अतिक्रमण राज्य परिवहन मंडळासाठी डोकेदुखी ठरणार आहे.