मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच मोठी घसरण झाली. सरकारने एलआयसीमधील हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) माध्यमातून सवलतीच्या दरात विकण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. परिणामी, कंपनीचा शेअर एका टप्प्यावर सुमारे 9 टक्क्यांनी घसरला.
केंद्र सरकारने एलआयसीमधील 6.5 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात 2 टक्के हिस्सा ओएफएसद्वारे विकला जाणार असून, मागणी चांगली राहिल्यास आणखी 4.5 टक्के हिस्सा विकण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. सरकारने या विक्रीसाठी प्रति शेअर किमान 382 रुपये किंमत निश्चित केली असून, या व्यवहारातून सुमारे 31,400 कोटी रुपये उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
एलआयसीचा शेअर सोमवारी 424.40 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, मंगळवारी बाजार सुरू होताच तो घसरून 392 रुपयांपर्यंत आला आणि पुढे 390 रुपयांच्या आसपास व्यवहार झाला. ओएफएसमधील शेअर्स बाजारभावापेक्षा सुमारे 11 टक्के सवलतीत उपलब्ध करून दिल्याने खुल्या बाजारातील शेअरवर दबाव निर्माण झाला.
या घसरणीमुळे एलआयसीच्या बाजार भांडवलातही मोठी घट झाली असून, कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 5.03 लाख कोटी रुपयांवर आले आहे. सध्या एलआयसीमध्ये केंद्र सरकारचा 96.5 टक्के हिस्सा असून, सार्वजनिक भागधारकांकडे केवळ 3.5 टक्के हिस्सा आहे. बाजार नियामकाच्या नियमानुसार सार्वजनिक भागभांडवल 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी एलआयसीला मे 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सरकारने नियोजित 6.5 टक्के हिस्सा विकल्यास ही अट पूर्ण होणार आहे.
एलआयसीची ओएफएस प्रक्रिया 4 ऑगस्टपासून बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुली झाली असून, 5 ऑगस्टपासून किरकोळ गुंतवणूकदारांनाही त्यात सहभागी होता येणार आहे.