पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

क्राईम महाराष्ट्र

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा

गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली.

27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी आयटी कंपनीत कार्यरत होता. सेक्टर-150 मधील एका निर्माणाधीन मॉलच्या उघड्या आणि पाण्याने भरलेल्या बेसमेंटमध्ये युवराजची विटारा कार थेट कोसळली. धुक्यामुळे विजिबिलिटी शून्य असल्याने हा खड्डा त्याच्या लक्षातच आला नाही.

कार पाण्यात बुडू लागल्यावर युवराजने तात्काळ आपल्या वडिलांना फोन करत,“पप्पा, मी खोल खड्ड्यात पडलोय… मी बुडतोय… प्लीज मला वाचवा, मला मरायचं नाहीये,”अशी आर्त हाक दिली. त्या फोननंतर सुरू झाला मृत्यूशी थरारक संघर्ष.

वडिलांच्या डोळ्यादेखत घडली हृदयद्रावक घटना

वडील राजकुमार मेहता घटनास्थळी पोहोचले तेव्हा युवराज कारच्या टॉपवर उभा राहून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात मदतीसाठी ओरडत होता. मात्र, गोठवणारी थंडी, अंधार आणि सुमारे 70 फूट खोल पाण्यामुळे उपस्थितांपैकी कोणीही पाण्यात उतरण्याचे धाडस करू शकले नाही.पोलिसांनी दोरी टाकून बचावाचा प्रयत्न केला, पण अंधार आणि अपुऱ्या साधनसामग्रीमुळे तो निष्फळ ठरला. जवळपास अडीच तास युवराज मदतीची वाट पाहत होता.

प्रशासन अपयशी, तर डिलिव्हरी एजंटने दाखवलं धाडस

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळी पुरेसे गोताखोर किंवा अत्यावश्यक बचाव उपकरणे उपलब्ध नव्हती. दरम्यान, डिलिव्हरी एजंट मोनिंदरने कंबरेला दोरी बांधून खोल पाण्यात उडी घेत उल्लेखनीय धाडस दाखवले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.पहाटे सुमारे 1:45 वाजता युवराजची कार पूर्णपणे पाण्यात बुडाली आणि वडिलांच्या डोळ्यादेखत युवराजचा मृत्यू झाला.

PM रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, बर्फासारख्या थंड पाण्यात जवळपास दोन तास मृत्यूशी झुंज देताना आणि प्रचंड भीतीमुळे युवराजला कार्डियक अरेस्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. वेळेत मदतकार्य न सुरू झाल्याने आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका होतकरू तरुणाचा जीव गेला.

या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, निष्काळजी प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.