मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. काही जण राजकीय फायदा मिळवण्यासाठी या मुद्द्याचे भांडवल करून वातावरण तापवत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अतुल लोंढे म्हणाले की, हे ट्विट व्यक्तीला उद्देशून नसून समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात वापरलेल्या राजकीय संदर्भातील शब्दाचा उल्लेख होता. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महिलांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहेत. बीडमधील पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्नांची उत्तरे देऊ न दिल्याच्या पार्श्वभूमीवर हे ट्विट करण्यात आले होते. मात्र, त्यावर हिंसक प्रतिक्रिया उमटल्याने ते ट्विट हटवण्यात आले आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खेद व्यक्त केला.
तरीदेखील हा मुद्दा पुढे रेटला जात असून केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप लोंढे यांनी केला. भाजपची विचारसरणी महिलांना दुय्यम स्थान देणारी असल्याची टीका करत त्यांनी एका ट्विटच्या निमित्ताने राज्यातील वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले.
अजित पवार हे शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी असून महिलांचा सन्मान करणारे नेते होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते भाजपच्या पद्धतीचे अनुकरण करत असल्याचे दिसते, जे योग्य नसल्याचेही अतुल लोंढे यांनी नमूद केले.