गैरसमज दूर होईल; मनोज जरांगेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र

जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत मराठा समाजाशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. जात प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे शिंदे यांचाच हात असल्याचा दावा करत, “तुमच्यासाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्या, पण आता तुम्ही आम्हाला नाराज केले,” असे जरांगे म्हणाले.

जरांगे यांनी पुढे इशारा देत, “भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी २५ ते ३० आमदार पाडू शकतो. गरज पडली तर शिवसेनेच्या सर्व जागाही पाडून टाकीन,” असे विधान केले. तसेच, “फडणवीस आणि शिंदे यांनी मला तुरुंगात टाकले तरी मी घाबरणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांचा गैरसमज दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. “मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, कुणबी प्रमाणपत्रांचा मार्ग खुला केला, तसेच सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. ओबीसी समाजाचे नुकसान न करता मराठा समाजाला शक्य ते सर्व दिले. याची माहिती जरांगे यांनाही आहे,” असे शिंदे म्हणाले.

दरम्यान, संभाजीनगरातील काही व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांबाबत झालेल्या कारवाईवरूनही जरांगे यांनी शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाठ आणि संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत