शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

महाराष्ट्र

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक बदल सुरू असून, पक्षाचे सर्व प्रवक्ते पदावरून हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लवकरच नव्या प्रवक्त्यांची घोषणा केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, येत्या 15 आणि 16 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीती, संघटन विस्तार आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यभर आक्रमकपणे काम करणारे पदाधिकारी तयार करण्यावरही पक्षाचा भर असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यापूर्वी चार दिवसांपूर्वीच पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले होते. विद्यार्थी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवक संघटनेत ग्रामीण आणि शहरी अशा दोन स्वतंत्र प्रदेशाध्यक्षपदांची निर्मिती करून शहरी प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

युवती संघटनेतही बदल करत शहर प्रदेशाध्यक्षपदी मनाली भिलारे आणि ग्रामीण प्रदेशाध्यक्षा म्हणून अमृता कालदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा नेतृत्वाला प्राधान्य देत पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.आता सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द झाल्यानंतर नव्या प्रवक्त्यांच्या निवडीत पक्ष कोणत्या चेहऱ्यांना संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत