राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे विकासाच्या रोडमॅपने उत्तर

महाराष्ट्र

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा रोडमॅप समोर ठेवत प्रत्युत्तर दिले आहे. नवीन विमानतळ, एरो सिटी, मेडिसिटी आणि मोठ्या प्रमाणावरील ग्रोथ हबच्या माध्यमातून तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकेंद्र बनवण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली येथे ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’ पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे बोलत होते.

“सरकारला तिसऱ्या मुंबईचे काय करायचे हेच माहिती नाही,” अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी केवळ राजकीय टीका न करता सरकारच्या नियोजनाची माहिती दिली.

“तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला आहे. तिथे एरो सिटी, मेडिसिटी आणि मोठ्या प्रमाणावर ग्रोथ हब तयार होत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन होत आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.

त्यामुळे ‘तिसऱ्या मुंबईचे काय करायचे हे सरकारला माहिती नाही’ या राज ठाकरे यांच्या आरोपाला, ‘काय करायचे हे ठरले आहे आणि त्यासाठी नियोजन सुरू आहे,’ असा संदेश शिंदे यांच्या वक्तव्यातून देण्यात आला.

रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार

तिसरी मुंबई भविष्यात महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे नवे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एरो सिटी, मेडिसिटी, ग्रोथ हब तसेच त्यांच्याशी संबंधित उद्योग आणि सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

नवीन विमानतळाभोवती निर्माण होणारी आर्थिक परिसंस्था या संपूर्ण परिसराच्या विकासाला वेग देण्याची शक्यता आहे. विमान वाहतूक, आरोग्यसेवा, उद्योग, सेवा क्षेत्र आणि आधुनिक पायाभूत सुविधांना यामुळे चालना मिळणार आहे.

मुंबईवरील वाढता ताण कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार होत असताना भविष्यातील नागरी गरजा, वाहतूक व्यवस्था, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास लक्षात घेऊन तिसऱ्या मुंबईचे नियोजन केले जात असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुंबईवरील वाढता लोकसंख्येचा आणि पायाभूत सुविधांचा ताण कमी करण्यासोबतच नव्या विकासकेंद्राला आकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पातून गुंतवणूक, उद्योग आणि रोजगाराला चालना मिळून संपूर्ण परिसराचा आर्थिक कायापालट होऊ शकतो, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

तिसऱ्या मुंबईच्या विकासावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, सरकारने या भागासाठी एरो सिटी, मेडिसिटी आणि ग्रोथ हबसारख्या प्रकल्पांचे नियोजन केल्याचे शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत