नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून उभा राहिला. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“सीमेवर बंदूक घेऊन अहोरात्र जागणाऱ्या जवानांमुळे आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही केवळ सामाजिक सेवा नसून देशसेवेची भावना आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
‘सिंदूर महारक्तदान’ उपक्रमाचा उद्देश केवळ रक्तसंकलन करणे नसून, देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या त्यागाची समाजाला जाणीव करून देणे हा असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले शिवसैनिक, कार्यकर्ते, पैलवान आणि रक्तदाते या उपक्रमात सहभागी झाले.
रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवण्याचे सामर्थ्य आहे. जवानांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. देशहित आणि राष्ट्रसेवा ही कोणत्याही राजकीय चौकटीपेक्षा मोठी असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या राष्ट्रनिष्ठ परंपरेचा उल्लेख केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा दिला. याच परंपरेतून महाराष्ट्रातील नागरिक आज सीमावीरांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे शिंदे म्हणाले.
देशाच्या सुरक्षेचा संदर्भ देताना शिंदे यांनी एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचाही उल्लेख केला. भारत कोणालाही छेडत नाही; मात्र भारताला कोणी छेडले तर सोडतही नाही, असा स्पष्ट संदेश देशाच्या सामर्थ्याची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र निर्मिती आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला मिळणारी चालना यामुळे भारताचे संरक्षण कवच अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रानेही या उपक्रमाला उत्स्फूर्त साथ दिली. महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान आणि कार्यकर्त्यांनी रक्तदानात सहभाग घेतला. आखाड्यात पराक्रम गाजवणाऱ्या पैलवानांनी जवानांच्या सन्मानासाठी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल शिंदे यांनी चंद्रहार पाटील यांचे विशेष अभिनंदन केले.
‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून रक्तदान, सैनिकांचा सन्मान आणि राष्ट्रभक्ती या तीन भावनांना एकत्र आणत महाराष्ट्राने देशाच्या राजधानीत जवानांप्रती असलेल्या कृतज्ञतेचा संदेश दिला.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, व्हाइस अॅडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी, लेफ्टनंट जनरल अविनाश दास, राज्यसभा सदस्य डॉ. ज्योती वाघमारे, महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह लष्करी अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी शिंदे यांनी भारतीय जवानांना कृतज्ञतापूर्वक सलाम केला. “भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंद आणि जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.
सीमेवर जवान देशासाठी रक्त सांडत असताना देशाच्या अंतर्गत भागातून त्याच्यासाठी रक्तदानाची साथ उभी राहिली. ‘सिंदूर महारक्तदान’च्या माध्यमातून महाराष्ट्राने जवानांप्रती असलेल्या कृतज्ञतेला कृतीची जोड दिली.