कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपया 50 पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खरेदी दर 11 ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर महिन्याला सुमारे 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार असल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली आहे.
म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात वाढ
नवीन दरानुसार, 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफ गुणप्रतीच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 53.50 रुपयांवरून 55 रुपये करण्यात आला आहे. तर 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या गाय दुधाचा खरेदी दर 36 रुपयांवरून 37 रुपये करण्यात आला आहे.
दरम्यान, गोकुळने म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मात्र, गाय दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
चारा उपलब्धतेवर परिणाम
यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने तसेच काही भागात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असल्याने चाऱ्याच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम पशुधनाच्या दूध उत्पादनावरही होत असून दूध संकलनात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गोकुळने स्पष्ट केले आहे.
गोकुळशी सुमारे 7 हजार 500 प्राथमिक दूध संस्था संलग्न असून, या संस्थांच्या माध्यमातून दररोज सरासरी 14 ते 15 लाख लिटर दूध संकलित केले जाते.
महागाईचा विचार करून निर्णय
सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या आणि इंधनाच्या दरातील वाढ तसेच एकूणच महागाईचा विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याचे गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी सांगितले.
याआधी फेब्रुवारी महिन्यातही गोकुळने म्हैस दूध खरेदी दरात 1 रुपया, तर गाय दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ केली होती. आता पुन्हा खरेदी दर वाढवल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.