‘सिंदूर महारक्तदान’ला दिल्लीतील जवानांसाठी शिवसैनिकांचा सलाम; ८०० जणांचे रक्तदान

महाराष्ट्र

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले, तर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ ही देशसेवा, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत प्रवास करून सैनिकांसाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि शिवसैनिकांचे त्यांनी कौतुक केले.

क्रांतिदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने नवी दिल्लीतील बेस हॉस्पिटल, दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिवसैनिक, खेळाडू आणि मल्लांसह ८०० जणांनी रक्तदान केले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली या महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः रक्तदान करत सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या सहभागातून शिवसैनिकांसमोर राष्ट्रसेवेचा नवा आदर्श निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

‘रक्तदान हेच खरे महादान’

यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दिल्लीतील सैनिकांसाठी रक्तदान करण्यासाठी येणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीतून आलेल्या या रक्तदात्यांनी शौर्य आणि करुणेचा वारसा जपला आहे. रक्तदान हेच खरे ‘महादान’ असून, या शिबिरातून संकलित होणारे रक्त आपत्कालीन परिस्थितीत जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

१६ हजारांची नोंदणी, क्षमतेनुसार ८०० जणांचे रक्तदान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक केले. गेल्या वर्षीच्या रक्तदान शिबिरासाठी महाराष्ट्रातून सुमारे ९ हजार रक्तदात्यांनी नावनोंदणी केली होती. यंदा हा आकडा तब्बल १६ हजारांवर पोहोचला. मात्र, लष्करी रुग्णालयाची उपलब्ध क्षमता आणि नियोजन लक्षात घेऊन प्रत्यक्ष ८०० जणांचेच रक्तदान करून घेण्यात आले, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

“सीमेवर बंदूक घेऊन जागणाऱ्या जवानांमुळेच आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. त्यांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही छोटी गोष्ट नसून हीसुद्धा राष्ट्रसेवाच आहे. सीमेवर लढत नसले तरी आज रक्तदान करणारे हे ‘रक्तवीर’ खरे योद्धेच आहेत,” असे शिंदे म्हणाले.

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी आणि लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.

रक्तदान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना लष्करी रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय महाराष्ट्र’च्या जयघोषात ‘सिंदूर महारक्तदान शिबिरा’चा उत्साहात समारोप झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत