अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या ताटात निकृष्ट आहार? प्रयोगशाळा अहवालाने खळबळ; विजय वडेट्टीवार आक्रमक

महाराष्ट्र

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना पुरविण्यात येणाऱ्या गरम व ताज्या आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असता, काही पदार्थ निर्धारित मापदंडांनुसार नसल्याचे, तर काही पदार्थ सेवनासाठी असुरक्षित असल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणावर विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या नागपूर विभागीय उपआयुक्त कार्यालयाने १८ जून २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना पाठविलेल्या पत्रासोबत प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर यांचे आहार तपासणी अहवाल जोडण्यात आले आहेत. या अहवालांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या काही खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

बालकांना दिला जाणारा आहार हा त्यांच्या पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रयोगशाळेच्या तपासणीतच आहारातील काही पदार्थ गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरत असतील किंवा सेवनासाठी असुरक्षित आढळत असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.

पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. “अंगणवाडीतील चिमुकल्या बालकांच्या ताटात निकृष्ट अथवा आरोग्यास अपायकारक आहार कसा पोहोचला? याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी केला.

अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषणाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र, त्याच योजनेअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रयोगशाळेच्या अहवालातून गंभीर निरीक्षणे समोर येत असतील, तर संपूर्ण आहार पुरवठा व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

“बालकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय राजकारणाचा नसून त्यांच्या भवितव्याचा आहे,” अशी भूमिका मांडत अहवालातील प्रत्येक त्रुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, केवळ गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यांपुरती कारवाई न करता चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पुरविण्यात येणाऱ्या आहाराची व्यापक तपासणी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. आहाराचे नमुने नियमितपणे प्रयोगशाळेत तपासावेत, दोषी आढळणाऱ्या पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी आणि बालकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत