ड्रग्सच्या शोधात पोलिसांचा छापा; २० पोत्यांत तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा सापडला!

महाराष्ट्र

पुणे : काकडेवस्ती परिसरात खासगी ट्रॅव्हल्समधून अमली पदार्थांचा साठा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकला. मात्र, पोलिसांच्या हाती ड्रग्सऐवजी तब्बल १२०० किलो संशयास्पद खवा लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे २० पोत्यांमध्ये खवा आढळून आला. हा खवा नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा वापर कुठे आणि कशासाठी होणार होता, तसेच तो शुद्ध आहे की भेसळयुक्त, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

खव्याची गुणवत्ता आणि त्यामध्ये भेसळ आहे की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाशी (FDA) संपर्क साधला. मात्र, सुट्टीचे कारण देत अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे.

संशयास्पद खाद्यपदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर त्याचे नमुने घेऊन तातडीने तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याने पोलिसांसमोर पुढील कारवाईबाबत अडचणी निर्माण झाल्या.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आता या १२०० किलो खव्याचे नमुने तपासल्यानंतरच त्याची गुणवत्ता आणि त्यामध्ये भेसळ आहे की नाही, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे. त्यामुळे या खव्यामागे नेमके कोण आहे आणि तो कुठे पाठवला जाणार होता, याकडे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत