संभाजीनगर: लाडगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श पतसंस्थेतील 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम आदर्श पतसंस्थेत जमा केली होती. रामेश्वर यांचे वडील नारायण यांच्या नावे साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे नऊ लाख रुपये आणि मुलगी अश्विनी हिच्या नावे पाच लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या.

ही रक्कम एकूण 22 लाख 50 हजार रुपये एवढी आहे. मात्र पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा समोर आला. यानंतर पैसे बुडाल्याच्या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य संचालक अंबादास मानकापेंना अटक
आदर्श नागरी सहकारी संस्थेत झालेल्या घोटाळ्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य आरोपी फरार झाले होते. दरम्यान पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता.
दरम्यान अंबादास मानकापे यांना अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी गोलवाडीत येताच मोठ्या चतुराईने सिडको पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना खबऱ्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती, त्यानुसार सापळा लावत मानकापेंना अटक करण्यात आली आहे.
