लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! जुलैचा ₹1500 हप्ता कधी मिळणार?

महाराष्ट्र

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ दिला जातो. जुलै महिन्याच्या हप्त्याची अनेक महिला प्रतीक्षा करत असून, हा हप्ता १५ ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या निधीचे थेट हस्तांतरण करण्याबाबत आगामी मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लवकरच १५०० रुपये जमा होऊ शकतात.

दरम्यान, यापूर्वी जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. शासनाने दर महिन्याला १० तारखेपर्यंत हप्ता जमा करण्याचे नियोजन केले आहे.

ई-केवायसी न केल्यास हप्ता अडकणार?

लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून ई-केवायसीची प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे.

महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून, आयकर विभागाच्या माहितीसह विविध कागदपत्रांच्या आधारे पात्रता तपासली जात आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.

८० लाख महिला अपात्र?

ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर मोठ्या संख्येने महिला योजनेतून अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे. विविध त्रुटी तसेच योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रक्षाबंधनाला ₹३००० मिळणार?

जुलै महिन्याचा हप्ता १८ ऑगस्टपर्यंत खात्यात जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

त्यामुळे सध्या पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या निर्णयाकडे लागले आहे. जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अधिकृत निर्णयानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत