मंचर (प्रतिनिधी): दूधात भेसळ करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या टोळीविरुद्ध मंचर पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईला आणखी वेग आला आहे. दूध भेसळ प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आरोपी क्रमांक १ ते ११ तसेच मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात यापूर्वीच १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात आहेत. उर्वरित फरार आरोपींचा मंचर पोलिसांकडून कसून शोध सुरु आहे.
याबाबत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील विविध कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संतोष बबन मोरे (वय ४३, रा. शिरापूर, ता. पारनेर), दत्तात्रय रामदास भागवत (वय ४१, खडकवाडी, ता. आंबेगाव), गणेश सुदाम पडवळ (वय ४०, सविंदने, ता. शिरूर), आनंदा मारुती पवार (वय ५६, टाकळकरवाडी, ता. खेड), कुलदीप प्रकाश पवळे (वय ३०, ता. खेड), रविराज बबन थोरात (वय ३२, चांदोली बुद्रुक, ता. आंबेगाव), राजेंद्र भगवान सिनलकर (वय ४५, लोणी, ता. आंबेगाव), ओंकार पोपट गिरवले (वय २८, देवळगाव सिद्धी, ता. नगर), आशिष विठ्ठल लोंढे (वय ३०, एकलहरे, ता. आंबेगाव), सतीश महादू वाबळे (वय ४७, चांदोली खुर्द, ता. आंबेगाव) आणि प्रशांत पांडुरंग पडवळ (वय ३२, सविंदने, ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ७ यांना ९ ऑगस्ट रोजी पहाटे १:०६ वाजता, तर आरोपी क्रमांक ८ ते १० यांना त्याच दिवशी सकाळी ११:४९ वाजता अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या कालावधीत पोलिसांनी आरोपींकडे कसून तपास केला असता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या तपासात मुख्य आरोपी सुशांत बबनराव हिंगे याच्याकडेही चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान त्याने संबंधित आरोपींना दूध भेसळ करण्यासाठी वे पावडर, विविध रसायने आणि शॅम्पूची विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे दूध भेसळीच्या या रॅकेटमध्ये केवळ भेसळ करणारेच नव्हे, तर भेसळीसाठी लागणारे साहित्य पुरविणाऱ्यांचाही सहभाग असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
दरम्यान, प्रशांत पांडुरंग पडवळ यास १० ऑगस्ट रोजी रात्री ९:२९ वाजता अटक करण्यात आली. आज सर्व आरोपी तसेच मुख्य आरोपी हिंगे यांची उर्वरित पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दूध हा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील अत्यावश्यक पदार्थ असताना त्यात रासायनिक पदार्थ, पावडर आणि इतर घातक घटक मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण भेसळ साखळीचा सूत्रधार कोण, भेसळीचे साहित्य कुठून आणले जात होते, किती प्रमाणात भेसळयुक्त दूध बाजारात पोहोचवले गेले आणि या रॅकेटशी आणखी कोण कोण जोडलेले आहेत, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकरणात यापूर्वी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरु असून, तपास जसजसा पुढे जाईल तसतसे दूध भेसळीच्या या नेटवर्कमधील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.