सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

महाराष्ट्र

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडजवळील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

हल्लेखोराची ओळख जसपालसिंग अशी झाली असून तो पेशाने वकील असल्याची माहिती समोर आली आहे. ६२ वर्षीय जसपालसिंग हा मूळचा पुण्याचा असून पुणे न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होता. मागील सुमारे दोन वर्षांपासून तो नांदेडजवळील मुगट येथील मातासाहिब गुरुद्वारात सेवा करत असल्याचे सांगितले जात आहे.

हल्ल्यात सुखबीर सिंह बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना सुमारे चार ते पाच सेंटीमीटरची जखम झाली असून नांदेड येथील यशस्वी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. या घटनेत पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनाही दुखापत झाली असून त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपी जसपालसिंगची चौकशी सुरू असून चौकशीनंतर हल्ल्याचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

फडणवीसांकडून गंभीर दखल

सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच त्यांनी स्वतः सुखबीर सिंह बादल यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बादल यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींनीही घेतली प्रकृतीची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुखबीर सिंह बादल यांच्या प्रकृतीची फोनवरून विचारपूस केली. मोदी यांनी सुखबीर बादल यांच्या पत्नी आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सुखबीर बादल यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी त्यांच्या लवकर प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, नांदेडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत