मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल आणि कॅशलेस प्रवासाच्या दिशेने एसटीने सुरू केलेल्या या उपक्रमाला अल्पावधीतच लाखो प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे.
१२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासात डिजिटल व्यवहाराकडे प्रवाशांचा वाढता कल स्पष्ट होत आहे.
NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटीच्या तिकीट व्यवहारात सुलभता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची गरज कमी होऊन तिकीट व्यवहार अधिक डिजिटल आणि सोपा होणार आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटी ही केवळ प्रवासी वाहतूक व्यवस्था नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ‘लालपरी’चा प्रवास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. NCMC कार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवत असल्याचे त्यांनी म्हटले.
१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांची नोंदणी
दरम्यान, १५ ऑगस्टपासून राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी NCMC कार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
NCMC स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच एसटीच्या अधिकृत एजंट नेटवर्कमधून उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याच माध्यमातून कार्ड रिचार्ज करण्याची सुविधाही मिळणार आहे.
१ सप्टेंबरपासून कार्ड अनिवार्य
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र प्रवाशांनी तातडीने NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
प्रवाशांचा वेळ वाचवणे, तिकीट व्यवहार अधिक सुलभ करणे आणि एसटीच्या सेवांना डिजिटल स्वरूप देणे, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्डचा वापर भविष्यात आणखी व्यापक करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे.