मुंबई: सन १९६८-६९ मध्ये बोरीवलीत ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. पश्चिम उपनगर ते पालघर पर्यंत च्या वाढत्या लोकसंख्येमुळे ३६५ खाटांचे भगवती रुग्णालय महापालिकेतर्फे सुरू होते. नोबेल केमिस्टला जागा देऊन ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले. बोरीवली रेल्वे स्टेशन झालेला बॉम्ब स्फोट, २००५ साली अति पर्जन्य वृष्टी कालावधीत या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात आले.
रेल्वे, प.द्रु. मार्गा वरील अपघात व वाढती लोकसंख्या यामुळेच या रुग्णालयाचा पुनर्विकास व अदयावतीकरण (स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी) (१००० खाटा) करण्यासाठी २००३ ते २००९ या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका सभागृह, तत्कालीन महापालिका आयुक्तांनी मंजूरी दिली व २०१० मध्ये याचे भूमिपूजन मा.श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वास्तू विशारद शशी प्रभू यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी दिली. अजूनही कामे अपूर्ण आहेत.
महापालिका आयुक्तांनी महापालिका अर्थसंकल्प सादर करताना भगवती सर्व साधारण रुग्णालय सार्वजनिक व खाजगी धर्तीवर (ppp) तत्वावर प्रचलन व परिरक्षण करण्याचे जाहीर केले. (दि. १०) मार्च २०२५ रोजी यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या.
सुमारे २२२०० चौ. मिटर क्षेत्रफळ असलेल्या जागी ३.१५ चटईक्षेत्र देऊन नऊ माळयांचे ४९० खाटा असलेले हे रुग्णालय होत आहे. निविदेनुसार फक्त (१४७ खाटा) मुंबई शहर व उपनगरातील पिवळ्या/ भगव्या रेशन कार्ड धारक, महापालिका कर्मचारी, नगरसेवक व कुटुंबीय यांना महापालिका रूग्ण गणले जाईल व त्यांना निश्चित दरांनी रूग्ण सेवा दिली जाईल.इतर रूग्णांना खाजगी रूग्णालयाप्रमाणे दर आकारण्यात येईल. विनामूल्य आरोग्य सेवा नाहीच. तसेच फक्त ५५ कोटी जंगम मालमता, ३०० खाटांचे अथवा १०० खाटांचे रुग्णालय चालविण्याचा ५ वर्षाचा अनुभव असलेल्या संस्थेस निविदा भरता येईल. मुंबई महापालिका कायदा १८८८ कलम ६१ अन्वये रूग्णसेवा पुरविणे महापालिकेचे मुलभूत कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहीले आहे.
उत्तर मुंबईतून सर्वात जास्त कर महापालिकेला/ शासनाला मिळतो. अशा वेळी येथील नागरिकांना विनामूल्य अथवा कमी दराने आरोग्य सेवा महापालिकेने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. महापालिकेने सदर धोरण रद्द करावे व निविदा रद्द कराव्यात व मुंबई महापालिकेने अंधेरी ते दहिसर ठाणे पालघर येथील नागरिकांना उपयुक्त असलेल्या भगवती रूग्णालयाचे प्रचलन व परिरक्षण करून येथील गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी नागरिक, विविध सामाजिक संस्था, काँग्रेस पक्ष व शिवसेना (उबाठा) करीत आहे.
आज मुंबई महापालिकेत प्रीबिड बैठक अति. आयुक्त ( प उ) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना (उबाठा) व काँग्रेस तर्फे जोरदार विरोध केला व बैठक रद्द करण्यास भाग पाडले. माजी आमदार विनोद घोसाळकर, विलास पोतनीस, ॲड संदेश कोंडविलकर ॲड अशोक सुत्राळे माजी नगरसेवक उदेश पाटेकर हर्षद कारकर चेतन कदम तेजस्वी घोसाळकर सुजाता पाटेकर श्वेता कोरगांवकर सिमंतिनी नारकर सिनेट सदस्य शशिकांत झोरे व मिलींद साटम तसेच संजय भोसले अशोक महामुणकर शुमदा शिंदेआदि नेते उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.