मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुखबीर सिंग बादल लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे तसेच सुरक्षेत काही त्रुटी आढळल्यास त्याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
धार्मिक किंवा सामाजिक ठिकाणी होणाऱ्या अशा हिंसक घटनांना महाराष्ट्रात किंवा देशात कोणतीही जागा नाही, असे सांगत शिंदे यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपासाअंती प्रत्येक दोषीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“धार्मिक स्थळांची पवित्रता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.