मुंबई: विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह नगर परिषदेचे १९ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष आणि कर्नाटकातील बेळगाव येथील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
मुंबईतील नंदनवन या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यात शिंदे यांनी नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. “दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची संपूर्ण साथ राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि १९ नगरसेवकांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विदर्भात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या कार्याचे कौतुक करताना विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केल्याचे नमूद केले. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हे महायुती सरकारचे ध्येय आहे. “विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. राज बोरकर, संदीप मेश्राम, सचिन कुंभारे, केतन सहारे, पंकज बोरकर, श्रीकांत रामटेके, प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले, बेळगाव तालुका अध्यक्ष दीपक बोधले, युवा अध्यक्ष रोहित पाटील, मांगुर शाखाप्रमुख सुरेश हेमाजे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यास आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू, आमदार प्रा. मनीषा कायंदे, अमरावती जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे यांच्यासह विदर्भ व कर्नाटकातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुरू असलेली संघटनवाढ आणि या सामूहिक पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे बळ आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत.