सहा खासदारांच्या पक्षांतराला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस; शिंदे गटासमोरील कायदेशीर पेच वाढणार?

राजकीय

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी या सहा खासदारांच्या पक्षांतराला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान संबंधित खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या पक्षांतराच्या वैधतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वी या सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला होता. मात्र, आता याच पक्षांतराला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळाल्याने शिंदे गटासमोरील कायदेशीर पेच वाढण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसमुळे या सहा खासदारांच्या पक्षांतराबाबत पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या खासदारांचे पक्षांतर कायदेशीरदृष्ट्या टिकणार का, याबाबतच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत