डिंग्रजवाडीत भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी; झोक्याची परंपरा मात्र हरवली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कोरेगाव भीमा: शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे नागपंचमीचा सण पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सुवासिनी व महिलांनी एकत्र येत वारुळाचे विधिवत पूजन केले. नागदेवतेला लाह्या व दूध अर्पण करून धार्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा करण्यात आली.

नागपंचमीच्या निमित्ताने सकाळपासूनच महिलांनी वारुळाजवळ गर्दी केली होती. वारुळाला हळद-कुंकू, फुले अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लाह्या व दूध वाहून नागदेवतेचे स्मरण करण्यात आले. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसह शेतकरी आणि शेतीच्या भरभराटीसाठी महिलांनी प्रार्थना केली.

महिलांनी सामूहिकपणे नागपंचमी साजरी केल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातील पारंपरिक सण-उत्सवांच्या माध्यमातून जुन्या रूढी-परंपरा जपण्याचे काम आजही सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.

या पूजनासाठी डिंग्रजवाडीच्या उपसरपंच संगीता गव्हाणे, लक्षदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव दिपाली गव्हाणे, तसेच सुवर्णा गव्हाणे, पूजा गव्हाणे, निकिता गव्हाणे, अक्षदा गव्हाणे, संस्कृती गव्हाणे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नागपंचमीच्या झोक्याची परंपरा हरवली!

एकेकाळी नागपंचमी म्हटले की गावागावांत झाडांच्या फांद्यांना बांधलेले मोठमोठे झोके, झोके खेळणाऱ्या महिला-मुली आणि पारंपरिक गाण्यांनी भारलेले वातावरण असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे नागपंचमीतील झोक्याची ही पारंपरिक प्रथा हळूहळू लोप पावत आहे.

मोबाईल, सोशल मीडिया आणि मनोरंजनाच्या बदलत्या साधनांमुळे ग्रामीण भागातील सणांचा पूर्वीचा सामूहिक उत्साह कमी होताना दिसत आहे. त्यामुळे जुन्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सणांच्या माध्यमातून पारंपरिक खेळ, झोके आणि लोकपरंपरा जपण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत