मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असली, तरी मेट्रो परिसरातील जागा अद्याप संबंधित संस्थांकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी वरळी येथील आचार्य अत्रे चौक आणि नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
मेट्रो प्रकल्पासाठी ज्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, त्या जमिनींच्या मालकांना केवळ आर्थिक मोबदला देऊन न थांबता, त्यांना मेट्रो प्रकल्पातील कामांमध्येही सहभागी करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.
मोनोरेल-मेट्रो जोडणीचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश
सात रस्ता परिसरातील मोनोरेलचा ब्रिज अद्याप मेट्रो स्थानकाशी जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मोनोरेल आणि मेट्रो स्थानकाची जोडणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सचिन अहिर यांनी संबंधित प्रशासनाला दिले.
आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक परिसरातील रस्त्यांवरील अडथळे दूर करावेत तसेच फूटपाथ समतल ठेवावेत, जेणेकरून परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही, अशा सूचनाही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
२ ते ३ महिन्यांत डेब्रिज हटविण्याचे आश्वासन
नेहरू सायन्स सेंटर मेट्रो स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडून आहे. हा कामाचा कचरा हटवून जागा मोकळी करावी आणि ती महापालिकेकडे हस्तांतरित करावी, असे निर्देश अहिर यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MMRC) अधिकाऱ्यांना दिले. येत्या २ ते ३ महिन्यांत जागा मोकळी करून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येईल, असे आश्वासन MMRC अधिकाऱ्यांनी दिले.
मेट्रो-मोनोरेल प्रवाशांसाठी १.५ किमीचा वॉक-वे
मेट्रो आणि मोनोरेलच्या प्रवाशांना थेट कोस्टल रोडपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी सुमारे दीड किलोमीटरचा वॉक-वे उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.
दरम्यान, वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीचे एका खासगी संस्थेमार्फत नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, तेथे काही असुविधा निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सचिन अहिर यांनी स्मशानभूमीचीही प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.