पुणे : अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत लोहेगाव येथील **‘हॉटेल चुल मटण’**चा अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. सुधारणा होईपर्यंत संबंधित हॉटेलने अन्न व्यवसाय करू नये, असे निर्देश FDAने दिले आहेत.
नगर रोड परिसरातील जुना खराडी जकात नाका, खांदवे नगर, लोहेगाव येथील हॉटेल चुल मटणची FDAच्या पथकाने तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. अन्नपदार्थांची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने हॉटेलचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पुणे विभागात तीन आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याने संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १० लाख ७ हजार ४६० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणांत तीन आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
मुंबईतील सहा हॉटेलवरही कारवाई
पुण्यानंतर मुंबईतही FDAने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण आणि देखभालीमध्ये त्रुटी आढळून आल्याने मुंबईतील सहा हॉटेल आणि आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवायांमधून FDAने दिला आहे.