शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित अधिवास मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भरत दौंडकर यांच्या निदर्शनास बिबट्याचा वावर आल्यानंतर अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मी भोसले यांनीही शाळेच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या शेतात बिबट्या पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
बिबट्या या परिसरात पुन्हा-पुन्हा येण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळेच्या बाजूने सुरक्षा नेट लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, केवळ सुरक्षा नेट लावून प्रश्न सुटणार नसून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
वन विभागाने दुर्घटनेची वाट पाहू नये
बिबट्याचा वावर स्पष्टपणे आढळून आल्यानंतर वन विभागाने केवळ पाहणी करून थांबू नये, तर तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे. शाळेच्या परिसरात लहान मुले, अंगणवाडीतील विद्यार्थी आणि शिक्षक दररोज ये-जा करतात. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा माग काढावा, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.