साखरेच्या दरवाढीला ब्रेक कधी? तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ

महाराष्ट्र

मुंबई : ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे. गेल्या तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ५,७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, बाजारातील मागणीच्या तुलनेत हा कोटा कमी असल्याने दरवाढीला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी दोन लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा खुला करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे.

मात्र, केंद्र सरकारकडून या मागणीवर अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने साखरेच्या दरात सातत्याने तेजी दिसत आहे. त्यातच सट्टेबाजांची सक्रियता वाढल्याने बाजारातील तेजीला आणखी बळ मिळाल्याचे जाणकार व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साखरेच्या निविदांचे दरही क्विंटलला ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

अडीच महिन्यांनंतर नवीन गाळप हंगाम

ऑगस्टचे उर्वरित दिवस आणि त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर हे दोन महिने पाहता, सुमारे अडीच महिन्यांनंतर २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात बाजारातील साखरेचा पुरवठा आणि उपलब्ध साठा हा दरवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून वाढू शकतो पुरवठा

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे इतर राज्यांच्या तुलनेत साखरेचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील कारखान्यांना प्रत्येकी एक लाख टनाचा अतिरिक्त कोटा तत्काळ खुला केल्यास बाजारात साखरेचा पुरवठा वाढू शकतो. यामुळे वाढत्या दराला काही प्रमाणात आळा बसून बाजारभाव स्थिर होण्याची शक्यता आहे.

आता केंद्र सरकार साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कोट्याबाबत काय निर्णय घेते, याकडे साखर उद्योगासह व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत