शिरुर (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने ३९ जणांना २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या कारेगाव येथील भिशी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. सुलभा शरद नवले यांच्यासह त्यांची दोन मुले नितीन शरद नवले, सुहास शरद नवले आणि दोन सुना अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले, सर्व (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणातील तपासाची दिशा आता केवळ नवले कुटुंबापुरती मर्यादित राहणार का, की १९ भिशांच्या माध्यमातून झालेल्या कथित करोडो रुपयांच्या संपुर्ण आर्थिक उलाढालीची पाळेमुळे उखडली जाणार…? अशी दबक्या आवाजात सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
या प्रकरणात एक-दोन नव्हे तर तब्बल १९ भिशा चालल्या असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातल्या १७ भिशांच्या व्यवहाराची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यामुळे या सर्व भिशांमधून नेमकी किती रक्कम जमा झाली…? किती सदस्य सहभागी होते…? कोणाकडून किती पैसा घेण्यात आला…? कोणाला किती रक्कम परत मिळाली आणि उर्वरित रक्कम नेमकी कुठे गेली…? याचा हिशोब समोर येणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, भिशीच्या व्यवहारादरम्यान सुलभा नवले यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांच्याच काही जवळच्या नातेवाईकांनी आर्थिक व्यवहारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवून मोठी माया जमवल्याची दबक्या आवाजात चर्चा परिसरात सुरु आहे. त्यामुळे तक्रारदारांनी या व्यक्तींचीही कसून चौकशी करण्याची मागणी केल्याने प्रकरणातील संशयाची व्याप्ती वाढली आहे.
१९ भिशा; मग पैशांचा हिशोब कुठे…?
रांजणगाव पोलिसांनी आता केवळ गुन्ह्यात नाव असलेल्या आरोपींची चौकशी न करता १९ भिशांची स्वतंत्र आर्थिक तपासणी, बँक खात्यांची पडताळणी, ऑनलाइन व्यवहार, रोकड देवाणघेवाण, भिशीच्या पावत्या, वही-हिशोब आणि सदस्यांच्या जबाबांची सांगड घालणे गरजेचे आहे. या तपासातूनच करोडो रुपयांच्या व्यवहाराची खरी माहिती पुढे येऊ शकते. यातील तक्रारदारांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले की, जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर भिशी चालत होत्या, तर त्यांचे व्यवहार कोण सांभाळत होते…? पैशांची नोंद कोण ठेवत होते…? जमा झालेली रक्कम कोणाच्या ताब्यात होती…? भिशीची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा होत होती…? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भिशीच्या पैशांचा अंतिम लाभार्थी कोण होता…?
‘नातेवाईक’ या नात्याआड आर्थिक भूमिका लपली का…?
सुलभा नवले यांच्यासोबत असलेल्या काही जवळच्या नातेवाईकांची आर्थिक भुमिका तपासणे आता पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. कारण नवले यांचे नातेवाईक असल्याने त्यांना भिशीच्या व्यवहारांमध्ये सहज प्रवेश मिळाला होता का…? अशिक्षित व्यक्तीच्या नावावर व्यवहार करुन प्रत्यक्ष नियंत्रण दुसऱ्यांकडे होते का…? कोणाच्या सांगण्यावरुन पैसा फिरवला गेला…? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातूनच मिळणार आहेत. मात्र, चर्चा आणि आरोप म्हणजे दोष सिद्ध होणे नव्हे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींविरोधातील आरोपांची सत्यता कागदोपत्री पुरावे आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे तपासणे आवश्यक आहे.
तपास नवले कुटुंबापुरता मर्यादित राहू नये; तक्रारदारांची मागणी
कारेगाव भिशी प्रकरणातील खरी व्याप्ती समोर आणायची असेल तर पोलिसांनी ‘पैसा कुठून आला आणि कुठे गेला…?’ या एकाच सुत्रावर तपास केंद्रित करणे गरजेचे आहे. १९ भिशांचा प्रत्येक व्यवहार तपासला गेला, तर या कथित आर्थिक जाळ्यात आणखी कोणाची भूमिका होती का…? याचा उलगडा होऊ शकतो. आता तक्रारदारांसह कारेगावकरांचे लक्ष पोलिसांच्या आर्थिक तपासाकडे लागले आहे. गुन्हा दाखल झाला, आरोपींची नावे समोर आली; पण करोडोंच्या कथित व्यवहाराचा खरा हिशोब समोर येणार कधी…? आणि या प्रकरणाची पाळेमुळे नवले कुटुंबापलीकडे जात असतील, तर ती उखडून काढण्याचे धाडस तपास यंत्रणा दाखवणार का…? हा प्रश्न सध्या तक्रारदार विचारत आहेत.
कारेगाव भिशी प्रकरणात पोलिस कुणाकुणाची आर्थिक फसवणुक झाली. फसवणुक झालेल्या व्यक्तींनी भिशीत ती रक्कम कोणत्या स्वरुपात गुंतविली. या कथित व्यवहारात नक्की कोणाचे किती पैसे अडकले आहेत. याचा आम्ही सविस्तर तपास करत आहोत. या भिशीत अजुनही कोणाची आर्थिक फसवणुक झाली असेल तर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी.
कुमार कदम
पोलिस निरीक्षक
रांजणगाव पोलिस ठाणे