मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा, उपचारासाठी होणारी दिरंगाई आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
१७ ऑगस्ट रोजी डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या एका रुग्णाला ‘बेड उपलब्ध नाही’ असे सांगून उपचार नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर ॲड. मातेले यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह रुग्णालयाची पाहणी करून वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेतली.
पाहणीदरम्यान रुग्णांना उपचारासाठी मोठ्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. केस पेपर काढण्यासाठी सुमारे दोन तास, डॉक्टरांना दाखवण्यासाठी दोन तास आणि औषधे मिळवण्यासाठी आणखी दोन तास, अशा एकूण सहा तासांच्या प्रतीक्षेचा आरोप करण्यात आला आहे.
मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे
रुग्णालयातील विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. डॉक्टरांच्या ७० मंजूर पदांपैकी ४४ पदे भरलेली असून २६ पदे रिक्त आहेत. निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ४२ पदांपैकी १९ पदे भरलेली असून २३ पदे रिक्त आहेत.परिचारिकांच्या ७१ मंजूर पदांपैकी ६५ पदे भरलेली असून सहा पदे रिक्त आहेत. तर कामगारांच्या ८० मंजूर पदांपैकी ४८ पदे भरलेली असून ३२ पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हाऊसकीपिंग कंत्राटदारावरही आरोप
हाऊसकीपिंग कंत्राटदाराकडून करारानुसार पुरेसे कामगार उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसून PF आणि ESIC सुविधांपासूनही त्यांना वंचित ठेवले जात असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवरही परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या प्रमुख मागण्या
१७ ऑगस्टच्या कथित ‘बेड नाकारल्याच्या’ घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रिक्त पदे तातडीने भरावीत, केस पेपर, ओपीडी आणि औषध वाटपासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू कराव्यात, तसेच उपलब्ध आणि रिक्त बेडची माहिती दर्शविणारा डिजिटल बोर्ड रुग्णालयात बसवावा, अशा मागण्या राष्ट्रवादीकडून करण्यात आल्या आहेत.हाऊसकीपिंग कंत्राटदाराची चौकशी करून कामगारांना थकीत वेतन तसेच PF आणि ESICचे लाभ मिळवून द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“गरीब आणि गरजू नागरिकांसाठी महापालिका रुग्णालये हा मोठा आधार आहेत. मात्र, मुक्ताबाई रुग्णालयातील कथित गैरव्यवस्थेमुळे रुग्णांना उपचारांअभावी परत जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा ॲड. अमोल मातेले यांनी दिला.या पाहणी दौऱ्यात अक्षय खिल्लारी, कार्तिक घोंगे, किरणभाऊ मुके, सत्यवानदादा दळवी, निशांत जाधव, गणेश हाडवळे, श्री. शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.