लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या प्रभावामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात धीरज देशमुख यांनी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. अपुरा आणि अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट तसेच जमिनीत पुरेसा ओलावा न राहिल्याने कोरडवाहू शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक भागांत पेरण्या रखडल्या असून, उभी पिकेही धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या बिकट परिस्थितीत बाधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा व तालुकास्तरावर तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत आणि आवश्यक त्या ठिकाणी त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटीद्वारे थेट नुकसानभरपाई जमा करावी, शेती कर्जांचे पुनर्गठन करून व्याजमाफी द्यावी आणि संकटकाळात सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली तात्काळ स्थगित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याबरोबरच पशुधनाच्या संरक्षणासाठी चारा छावण्या आणि चारा बँका तातडीने सुरू कराव्यात, असेही धीरज देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती मदत न देता तातडीची आर्थिक मदत, पीक संरक्षण आणि दीर्घकालीन उपाययोजनांची प्रभावी सांगड घालून सरकारने बळीराजाला संकटातून बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असा पुनरुच्चार धीरज देशमुख यांनी केला आहे.