वाढदिवसासाठी लुटीचा कट; २४ तासांत चौघे जेरबंद!

क्राईम

पुणे: पुण्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट लुटीचा मार्ग स्वीकारणाऱ्या चौघांना पोलिसांनी अवघ्या एका दिवसात अटक केली. २३ फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरातील गुलटेकडी परिसरात राहणारे गणेश अण्णा जगधने (२९), अमोल उत्तम गायकवाड (३२), अतुल रवींद्र गायकवाड (३८) आणि संतोष राधाकिशन सरोदे (३१) यांनी अमोल गायकवाडचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा बेत आखला होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत लुटीचा कट रचला.

चौघांपैकी एक जण रिक्षाचालक असल्याने प्रवाशाला रिक्षात बसवून एकांत ठिकाणी नेऊन लुटण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार स्वर्गेट परिसरातून पुणे स्टेशनला जाणारे सत्येंद्र महतो (४१, सिवान, बिहार) हे त्यांच्या जाळ्यात अडकले. स्टेशनला सोडतो असे सांगून त्यांना रिक्षात बसवण्यात आले. काही अंतरावर गेल्यानंतर इतर तिघेही रिक्षात बसले आणि रिक्षा स्टेशनऐवजी निर्जन ठिकाणी वळवण्यात आली.

तेथे सत्येंद्र महतो यांना ठार मारण्याची धमकी देत ऑनलाइन व्यवहाराद्वारे २५ हजार रुपये उकळण्यात आले. पैसे घेतल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

लुटलेले २५ हजार रुपये घेऊन चौघांनी अमोलचा वाढदिवस साजरा केला. मात्र पीडिताने तत्काळ बंद गार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी ज्या पेट्रोल पंपावर थांबले होते, तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपींची ओळख पटली आणि चौघांनाही अटक करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता व त्यांच्या पथकाने केली.थोड्याशा आनंदासाठी निवडलेला गुन्हेगारी मार्ग अखेर या चौघांना थेट तुरुंगात घेऊन गेला. वाढदिवसाचा उत्साह एका दिवसातच कोठडीत बदलला.