मुंबई: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक प्रवासी अडचणीत सापडले होते.
या पार्श्वभूमीवर स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज फुजैरा विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत.
उड्डाणाची वेळ:
VT-GSO – दुपारी ३.३० वाजता टेकऑफ
VT-GSH – दुपारी ४.३० वाजता टेकऑफ
या दोन्ही विमानांद्वारे एकूण १६४ प्रवासी आज संध्याकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे दाखल होणार आहेत.
या प्रवाशांमध्ये पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज येथील ८४ विद्यार्थी तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगर आदी भागातील नागरिकांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला होता. “तुम्ही सर्व सुरक्षित आहात, काळजी करू नका. महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. तुम्हाला सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधत अखेर या १६४ प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संकटसमयी शासनाच्या या तत्परतेमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.