शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळवस्तीमध्ये जमिनीच्या वादातून मुलमुले कुटुंबावर दहशतीचा हल्ला झाला. लोखंडी रॉड, फावडे व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ व जीव मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा १४ जणांसह इतर सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिदास देविदास मुलमुले (वय 45, धंदा शेती, रा. हिलाळमळा, कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली.दि. २१ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय घरासमोर असताना आरोपींनी एकत्रितपणे हल्ला केला. जमिनीच्या गट नंबर 1631/1 च्या वादावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, धमक्या देत कुटुंबातील सर्व सदस्यांना मारहाण केली.फिर्यादींना समीर शिंदे व मंगल शिंदे यांनी लाथाबुक्क्यांसह काठीने मारहाण केली.
वडील देविदास यदु मुलमुले यांना दत्तात्रय शिंदे व संदिप शिंदे यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर व छातीवर वार केला.मुलगा सूरज, पुतण्या संग्राम, पत्नी संगिता तसेच भाऊ संतोष, वहिनी प्रमिला यांनाही आरोपींनी गंभीर मारहाण केली.महिलांना केस धरून ओढणे, जमिनीवर पाडणे व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादींनी केला आहे.समीर देवराम शिंदे, संदिप दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय विठोबा शिंदे, विनायक विठोबा शिंदे, देवराम विठोबा शिंदे, धुरपाबाई देवराम शिंदे, शोभा विनायक शिंदे, सुशिला दत्तात्रय शिंदे यांच्यासह सोनाली, मनिषा, पुनम, मनिषा समीर, बाई, मंगल शिंदे व सात अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
जखमींना शिरूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय उपचार करण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. अनिल आगलावे हे करत आहेत. गावात ही घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमिनीच्या वादातून वाढणाऱ्या हिंसक घटना थांबाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.