शिरुर तालुक्यात लिफ्टच्या बहाण्याने मंगळसूत्र लांबवणाऱ्या उच्चशिक्षित युवकाला अटक 

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिक्रापुर-बुरुंजवाडी रस्त्याने जाणाऱ्या महिलेला दुचाकीहून लिफ्ट देत चाकूचा धाक दाखवत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवल्याची घटना (दि 23) रोजी घडली होती. याबाबत शकुंतला वाबळे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे एका अज्ञात युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. CCTV फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि 23) रोजी शिक्रापुर (ता.शिरुर) येथील वाबळेवाडीच्या शकुंतला वाबळे या दुपारी तीनच्या सुमारास बुरुंजवाडी येथील शेतातून घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असताना एक अनोळखी युवक दुचाकीहून आला आणि मी तुम्हाला ओळखतो चला मला पण शिक्रापूरला जायचे असे म्हणून त्यांना दुचाकीवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर दुचाकीहून खाली उतरवत चाकू दाखवून वाबळे यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला.

याबाबत शकुंतला वामन वाबळे (वय ६०) रा. वाबळेवाडी, शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. रांजणगाव पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हा दाखल केला होता. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करत होते. तपासादरम्यान शिंदे यांनी मलठण फाटा, शिक्रापुर येथील CCTV फुटेज चेक करत गोपनीय माहितीच्या आधारे सचिन वैजनाथ होळगळ (रां. आटकरवाडी, पो. मालवंडी ता. माढा जि. सोलापूर याला अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता आरोपीला शुक्रवार (दि 30) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.