घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करणारा माजी खासदार ठरला दोषी

क्राईम महाराष्ट्र

बंगळूर: हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या बंगळूरमधील विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला. आज (२ ऑगस्ट) न्यायालय शिक्षेचा कालावधी जाहीर करणार आहे.

न्यायालयात प्रज्वल रेवण्णांना कोसळलं रडू

निकाल जाहीर होताच प्रज्वल रेवण्णा न्यायालयात भावनिक झाले आणि रडू लागले. न्यायालयातून बाहेर पडतानाही ते सतत रडत होते. एफआयआर दाखल झाल्यानंतर अवघ्या १४ महिन्यांत या प्रकरणाचा निर्णय देण्यात आला आहे.

‘ती’ साडी ठरली महत्त्वाचा पुरावा

या प्रकरणात पीडितेने ‘साडी’ महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर केली. आरोपानुसार, माजी खासदारानं घरकाम करणाऱ्या महिलेवर दोनदा बलात्कार केला होता. पीडितेने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तीच सीडी पुरावा म्हणून ठेवली होती. फॉरेन्सिक तपासात सीडीवर शुक्राणूंचे ठसे आढळल्याने खटला मजबूत झाला.

न्यायालय उद्या अंतिम शिक्षा ठरवणार

भारतीय दंड संहिता (IPC) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांखाली रेवण्णाविरुद्ध आरोप निश्चित झाले. न्यायालय आता उद्या अंतिम शिक्षा ठरवणार आहे.

२००० पानांचे आरोपपत्र अन् १२३ पुरावे गोळा

म्हैसूरमधील केआर नगर येथील घरकाम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीनंतर सीआयडीच्या सायबर क्राइम पोलिसांनी प्रकरण नोंदवले. तपास पथकाने २००० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून १२३ पुरावे गोळा केले. या प्रकरणात २३ साक्षीदारांच्या जबाबांची नोंद झाली.

सात महिन्यांत सुनावणी पूर्ण

३१ डिसेंबर २०२४ रोजी सुनावणी सुरू झाली आणि अवघ्या सात महिन्यांत खटला पूर्ण झाला. न्यायालयाने व्हिडिओ क्लिप्स, फॉरेन्सिक अहवाल आणि घटनास्थळाच्या तपासणी अहवालांचा अभ्यास करून निर्णय दिला. विशेष न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी आज दोषी ठरवून निकाल राखून ठेवला असून, उद्या शिक्षेची घोषणा होणार आहे.