लालबागेत भीषण अपघात; चार वर्षांच्या अथांग तावडेचा मृत्यू, बसचालकावर संतापाची लाट

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: मुंबईतील लालबाग परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. या दुर्घटनेत चार वर्षांचा चिमुकला अथांग तावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयातील पीआयसीयू (PICU) विभागात त्याच्यावर अतिदक्षता उपचार सुरू होते. सुरुवातीला तो उपचारांना प्रतिसाद देत होता; मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव बसची धडक

अथांग आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी परतत असताना हा अपघात घडला. जखमी मुलाचे वडील आणि तक्रारदार मंदार तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते परळ ब्रिज उतरून सेंट्रल रेल्वे वर्कशॉपजवळील सिग्नलवर थांबले होते. सिग्नल सुटण्यास अवघे १० ते १५ सेकंद बाकी असताना मागून भरधाव वेगात आलेल्या शिवशाही बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि अथांग गंभीर जखमी झाला.

अपघातात अथांगच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंदार तावडे यांनाही या अपघातात दुखापत झाली आहे.

बसचालकाला अटक, नंतर जामीन

ही शिवशाही बस (क्रमांक MH09 EM 8639) असल्याची माहिती समोर आली आहे. बसचालक शामराव नाथराव नगरगोजे याने वाहनावर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणे व वेगात बस चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी संबंधित बसचालकाला तात्काळ अटक केली होती. मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले. यानंतर बसचालकाचा हसतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एवढ्या गंभीर अपघातानंतरही चालकाच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून दिली जात आहे.

वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि पालकवर्गाकडून दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनचालकांवर अधिक कडक नियंत्रण ठेवावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईतील वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.