crime

गांजेवाडीच्या तुकाई देवी मंदिरात धाडसी चोरी करुन 9 लाखांचा ऐवज लंपास

क्राईम

आज पहाटे ११ ते ५ च्या दरम्यानची घटना, देवीच्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट 

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी (माळीमळ्यात) असलेल्या श्री तुकाई देवी मंदिरात आज सोमवार (दि. २) ला रात्री ११ ते पहाटे ५ च्या दरम्यान धाडसी चोरी झालीय. यात चोरट्यांनी तिजोरी, कपाट, देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवीचे डोळे, रोख रक्कम असा सुमारे 9 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती देवीचे पुजारी ज्ञानेश्वर गुजाराम मुलमुले यांनी बोलताना दिली. आज पहाटे पाचला देवीच्या पूजेसाठी ते मंदिरात आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेबाबत गोरक्ष प्रकाश शिंदे यांनी कळविल्यानंतर शिरुर पोलिसांना घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस पथक घटना स्थळी रवाना केले असून श्वान पथकाला ही पाचारण करण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

तिसऱ्यांदा देवीची चोरी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून पोलीस प्रशासनाने या चोरीचा तात्काळ छडा लावण्याची मागणी ग्रामस्थ व माजी सरपंच बबनराव पोकळे यांनी केली आहे. चोरीची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरासमोर जमा झाले होते.

तुकाई देवी मंदिरा शेजारीच असलेले श्री संत सावतामाळी, विठ्ठल रखुमाई मंदिर ही चोरटयांनी ग्रील उचकटून उचकापाचक केली असून मुख्य मंदिराच्या मागील बाजूस असलेले ग्रील तोडून चोरटयांनी मंदिरात चोरी केल्याची माहिती गोरक्ष शिंदे, संजय गायकवाड, रामभाऊ शिंदे, संपत गायकवाड यांनी दिली. घटनास्थळी टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले व कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून पुढील तपास ते करत आहे.