भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; जेवणाच्या वादातून चाकू हल्ला

क्राईम महाराष्ट्र

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून तिघा हल्लेखोरांनी हॉटेल मालक आकाश शेखर दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश दुबय्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी ऑर्डर देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून वेटरशी वाद घालत मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी आकाश दुबय्या पुढे आले असता संतप्त आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मार लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव या तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, श्रीरामपूर शहरात गेल्या ११ दिवसांत प्राणघातक हल्ल्याची ही चौथी घटना घडल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत