mahila sanghatana shirur

पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिरुर पोलिसांना निवेदन…

क्राईम

शिरुर (किरण पिंगळे): पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी (ता. 27) एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने एका युवतीवर कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिरुर मधील विविध संघटनाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चराफले यांना निवेदन दिले.

पुण्यात प्रेमास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून एका नराधमाने एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिक्षणासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या मुली भयभीत झालेल्या आहेत. मुलींना शिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवावे की नाही? असा पालकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या मुली आणि नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सदर माथेफिरु युवकांवर कडक कारवाई केल्यास ती महाविद्यालयीन युवती आणि तिच्या पालकांना न्याय मिळेल. तसेच या माथेफिरु युवकास कडक शिक्षा झाल्यास राज्यभरात चांगला संदेश जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिरुर पोलिस स्टेशन महिला दक्षता समिती, रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आदिशक्ती महिला मंडळ, आधारछाया फाऊंडेशन या सर्व महिला संघटनाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला दक्षता समितीच्या सदस्या शोभना पाचंगे, रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच शिरुर महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, आधरछाया फाऊंडेशन अध्यक्षा सविता बोरुडे, शिरुर महिला दक्षता समितीच्या सदस्या शर्मिला निचित, राणी शिंदे, छाया हारदे, सुवर्णा सोनवणे, ललिता पोळ, श्रुतिका झांबरे, जया खांडरे, डॉ. वैशाली साखरे, मोनिका राठोड, प्रीती बनसोडे, शिला बाचकर आदी महिला उपस्थित होत्या.