सासवड (प्रतिनिधी): पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सासवड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी राजकुमार विश्वनाथ हाके (वय ५८, रा. बधेनगर, कोंढवा, पुणे) हे त्यांच्या मावस बहिणीसोबत पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथील काळुबाई मंदिराच्या रस्त्याने जात असताना तिघा अज्ञातांनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून आरोपी पसार झाले होते.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही पोलिसांनी आरोपींनी पळ काढलेल्या मार्गावरील तब्बल ६५ किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातुन आरोपी पॅशन आणि सीडी डिलक्स या दोन मोटारसायकलींचा वापर करून सासवड–लोणंद मार्गे फलटणच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळू ईश्वर माळी (वय ५२), रोहित शिवाजी ननवरे (वय २८) आणि दिलीप गोरख माळी (वय ४५), तिघेही रा. फलटण, जि. सातारा यांना ३० जून २०२६ रोजी फलटण येथून ताब्यात घेत अटक केली.
सखोल चौकशीत आरोपींनी सासवड येथील जबरी चोरीसह यवत पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १३५/२०२६ आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०९/२०२६ हे गुन्हेदेखील केल्याची कबुली दिली. त्यामुळे या टोळीने विविध जिल्ह्यांत जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली, साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असा ५.२० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासात मुख्य आरोपी बाळू ईश्वर माळी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे, तर दिलीप गोरख माळी याच्यावर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि एसडीपीओ राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे तसेच अंमलदार सचिन घाडगे, संतोष तोडकर, महेश खरात, गुरुनाथ गायकवाड, विशाल भोरडे, अक्षय यादव, विकास कापरे, राहुल पवार, प्रविण शेंडे आणि तुषार लोंढे यांनी संयुक्तपणे पार पाडली.